वैजापूर: टँकर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक तरुणी ठार झाली, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गंगापूर येथील चौफुलीवर घडली. जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पूजा कनगरे (वय 14 वर्षे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. राजू सोळसे (रा. वैजापूर) हे आज सकाळी दुचाकी (क्र. एम.एच.15/एफ.के.29 96) वरून भाचीला लग्नासाठी नेण्याकरिता गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथे गेले होते. नेवरगाव येथून 14 वर्षीय भाची पूजा कनगरे हिला घेऊन वैजापूरकडे जात असताना समोरून आलेल्या भरधाव टँकर (क्र.एम.एच.06/बी.डी. 0270) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पूजा ही जागीच ठार झाली तर राजू सोळसे हे गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांच्यासोबत असलेला पाच वर्षीय चिमुरडादेखील रस्त्याच्या बाजूला फेकला गेल्यामुळे सुखरूप राहिला. या अपघातामुळे गंगापूर-वैजापूर रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मृतांना घाटी रुग्णालयात दाखल केले व वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद वैजापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.